Tuesday, 30 October 2012

भुसार घराण्याची ओळख

सतराव्या शतकात नायक गोपाल यांनी किराणा घराण्याची स्थापना केली. या घराण्याचा भर हळुवारपणे रागदारी उलगडत जाणे, दीर्घ दमश्वास, शुद्ध उच्चार या गोष्टींवर होता. अशाच प्रकारे सोळाव्या शतकात ग्वालियर घराणे, एकोणिसाव्या शतकात आग्रा, जयपूर वगैरे घराणी अस्तित्वात आली. प्रत्येक घराण्याची काही न काही तरी खासियत असते.

एकविसाव्या शतकात या सर्वांपासून वेगळे एक नवे घराणे अस्तित्वात आले. त्याचे काय झाले, की बंगळूर येथे श्रीयुत अमृत जोशी ऊर्फ महात्मा नावाचे एक गृहस्थ वसतिगृहात राहत होते. त्यांना नेहमी काही तरी नवीन करायची आवड होती. विविध घराण्यांचा त्यांचा अभ्यास होता. परंतु सतत ताना म्हणून म्हणून त्यांनी आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली. रागदारीचा अंतर्बाह्य विचार करून नवीन गणिते आखली, नवीन नियम तयार केले आणि नवीन रचना पाडल्या (बुंदी पाडल्या सारख्या). अनेक मिश्र राग तयार केले.

ही गायनाची पद्धत सर्वांसाठी नवीन होती. त्यांची एकेक तान ऐकणाऱ्याच्या हृदयास ताण देऊन जात असे. या निराळ्या पद्धतीमुळे अनेक लोक त्याकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी शिष्यत्व स्वीकारले. या शिष्यांनी या नवीन घराण्याला नाव देण्याचे ठरवले.

महाराष्ट्रात किराणा आणि भुसार मालाची अनेक दुकाने आहेत. जेव्हा या नवीन घराण्याचे संगीत कानावर पडते तेव्हा किराणा आणि भुसार मालाची आठवण होते. त्यापैकी किराणा घराणे आधीपासून अस्तित्वात आहे, त्यामुळे आपल्या घराण्याचे नाव भुसार ठेवावे असे शिष्यांनी ठरवले आणि त्याला लगेचच सर्व संमती मिळाली. गुरूंच्या परवानगीनंतर हे नाव समाजात प्रसृत करण्यात आले.

भुसार घराण्याचे काही नियम आणि अटी सुद्धा आहेत. त्यांची माहिती पुढच्या भागांमध्ये घेऊया.

 - एक भुसार शिष्य 

No comments:

Post a Comment